काही माझ्याबद्दल

for-web-sartaj1

सर्वांना नमस्कार,

थोडक्यात मी… 

मी सरताज शेख. सोलापुर जिल्हयातील ‘कुर्डुवाडी’ या छोटयाशा खेडेगावात एका गरीब कुटूंबात माझा जन्म झाला. लहानाचा मोठा तिथेच झालो. सगळं शिक्षण सोलापुर जिल्ह्यातच झालं. पुढचं शिक्षण कोपरगाव येथे झालं. मला खेळ, मराठी साहित्य आणि तंत्रज्ञानामध्ये विशेष आवड आहे. तंत्रज्ञानाला सर्वस्व मानतो. तंत्रज्ञानाचा वापर जास्तीत जास्त आणि चांगल्या प्रकारे कसा करता येईल याकडे माझ्या कल असतो. नेहमी हुशार, चांगल्या आणि निर्व्यसनी लोकांच्या संगतीत रहायला, त्यांच्याबरोबर फिरायला, गप्पा मारायला आवडतात. तसं कोणीही सापडलं नाही तर फालतू लोकांत मिसळण्यापेक्षा एकटंच राहणं पसंद करतो. ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ ह्या वाक्यावर माझ्या विश्वास आहे.

आत्मपरिक्षण…

आत्मपरिक्षण करताना सगळ्यात प्रथम मी माझ्यातले वाईट गुण शोधण्याचा प्रयत्न केला.  मला माझ्यातल्या दोषांबरोबर काही चांगले गुण सापडले. उलट केलं असतं तर फक्त चांगलेच गुण सापडले असते. मला असं वाटतं की जोपर्यंत माणूस स्वतःला त्याच्या गुण-दोषांसहीत ओळखू शकत नाही तो दुस-याला काय ओळखणार?  माझ्या वेबसाईटमधला ‘अबाऊट मी’ सेक्शन म्हणजे मीच माझ्यावर केलेला अभ्यास, माझ्यातल्या मला शोधण्याचा केलेला एक छोटासा प्रयत्न….

चिकित्सक वृत्ती…

माझ्यातला दुसरा महत्त्वाचा गुण आपल्या लक्षात येईल तो म्हणजे माझी चिकित्सक वृत्ती. कधी कधी या अती चिकित्सक वृत्तीचा मला जबरदस्त फटका बसतो. पण हे नुकसान चिकित्सक वृत्तीमुळे मिळणा-या फायद्यांच्या तुलनेत नगण्यच.

निर्भीड आणि रोखठोक स्वभाव…

कुजकट स्वभावाची, पाठीमागे बोलणारी माणसे मला अजिबात आवडत नाहीत. स्पष्ट, रोखठोक, समोरासमोर बोलणारी माणसे मला आवडतात. अशा लोकांशी माझी दोस्ती लगेच जमते.

खुप कमी बोलतो ?

मी फार कमी बोलतो असं खुप लोकांच मत आहे.खरेतर मी प्रथम कुणाशीही स्वतःहुन सवांद साधत नाही. काही जण मला शांत म्हणतात तर काही अकडू. कॉलेजला असताना मी तसा कमीच बोलत असे….खासकरुन मुलींशी. मी तसा जास्त बोलत नाही याचा अर्थ असा नव्हे की मला बोलताच येत नाही. खरं तर मी मुद्दामच कमी बोलतो. गरजेपुरतं व्यवस्थित बोलता येणे म्हणजे खुप झालं. वायफळ बडबड करायला मला अजिबात आवडत नाही. कमी बोलणं आणि जास्त काम हे आपलं सुत्र आहे. एखादा आवडीचा विषय असला कि त्या विषयावर तासन् ‍- तास बोलत राहणे मला खुप आवडतं. त्यातल्या त्यात कॉम्प्युटर ह्या विषयावर मी कुठेही, कधीही, कितीही वेळ बोलू शकतो.

समोरच्याचं बोलणं पुर्ण ऎकून घेवून आपलं योग्य ते मत मी मांडतो. कधी-कधी मी समोरच्या भावनांचा अजिबात विचार करत नाही. ती व्यक्ती किती मोठी आहे, कोणत्या हुद्यावर आहे, किती कमावते आहे, त्याला त्या क्षेत्रातला किती अनुभव आहे ह्या गोष्टी मी अजिबात विचारात घेत नाही. माझ्या मनाला आणि बुद्धीला जे पटतं तेच मी बोलतो. सुरूवातीला चुकीचं वाटणारं माझं मत, बरोबर होतं असं मागावून सांगणारे खुप लोकं मला भेटतात. प्रत्येक गोष्टीत चिकित्सक वृत्ती, इतरांपेक्षा वेगळा विचार करण्याची सवय आणि त्या विषयांत केलेला सखोल अभ्यास ह्या जोरावर मी माझं मत परखडपणे मांडतो.

कुंभ राशीचा हजरजबाबी आणि विनोदी माणूस…

ज्याला स्वतःवरती विनोद करायला जमतो ती व्यक्ती जगातल्या कुठल्याही व्यक्तीवर विनोद करु शकते असं मला वाटतं. खुप वेळा मी स्वतःवरच विनोद करत दुस-यांना हसवतो. (फायदा : दुस-यांना माझ्यावर विनोद करायची संधी मिळत नाही.) मला दुस-यांची खेचायला खुप आवडते. पण ज्या लोकांशी आपलं चांगलं जमतं त्याचीच मी थट्टामस्करी करतो.
माझ्यामते ह्या जगात जिंकण्यासारखी एक गोष्ट आहे, ती म्हणजे ‘मन’. मनाशिवाय शरीर म्हणजे गोळीशिवाय बंदूक. मी माझ्या खेळकर, विनोदी आणि हजरजबाबी स्वभावाने लोकांची मने जिंकायचा प्रयत्न करतो. दुस-याची हसवणूक करत-करत स्वतः हसत खेळत जीवन जगायला मला आवडतं.

माझा माझ्या कानांपेक्षा डोळयांवर जास्त विश्वास आहे आणि तो मला ठेवावाच लागतो. एखादी गोष्ट स्वतः डोळ्यांनी पहात नाही किंवा वाचत नाही तोपर्यंत मी त्यावर कधीच १०० टक्के विश्वास ठेवत नाही.

एखाद्या विषयातलं मला जर काहीच माहीत नसेल तर मी लगेच माहीत नाही असं सरळसरळ सांगून टाकतो. अर्धवट ज्ञान असेल तरीही मी मला येत नाही असचं सांगतो. अर्धवट ज्ञानावर उगाच फुशारक्या मारणे माझ्या मेंदूला आणि मनाला अजिबात पटत नाही. आपल्याला जी गोष्ट येत नाही; ती नाही येत म्हणून सांगायला मला अजिबात कमीपणा वाटत नाही. उलट त्या विषयांतल ज्ञान जाणून घेण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असतो.

आपल्याला किती येतंय हे चेह-यावर मी अजिबात दाखवत नाही. समोरच्याने मला ‘ढ’, ‘मठ्ठ’  ठरवावा असाच चेहरा करून बसतो. आपल्याला काहीच येत नाही असं दाखवतं, खरं तर एक प्रकारची मी समोरच्या व्यक्तीची परीक्षाच घेत असतो. कधी-कधी मी माझं नॉलेज मुद्दाम हाईड करतो. नॉलेज हाईड करणे ही गोष्ट मला सगळ्यात छान जमते. समोरची व्यक्ती नुसत्या भारंभार पुड्या सोडतेय हे पाहून मी मनातल्या मनात हसत असतो.

सर्च फॉर एक्सलंस…

मी कॉन्टिटीपेक्षा कॉलिटिला जास्त महत्व देतो. मी नेहमी ‘सर्च फॉर एक्सलंस’च्या शोधात असतो आणि ते मिळवण्यासाठी काहीही करायची माझी तयारी असते. ‘सर्च फॉर एक्सलंस’चा मूलमंत्र जोपासणा-या मलाही अजून मी पुरेसा उमजलो नाहीय. माझ्यातल्या माझा शोध अजूनही चालूच आहे……..चालूच राहणार……..निरंतर.

बाकी विशेष असं सांगण्यासारखं काहीही नाहीये. निदान मला तरी तसंच वाटतयं. :) मला वाटतं माझा हा ब्लॉगच तुम्हाला जास्ती सांगु शकेल माझ्याबद्दल. तेव्हा रिडत रहा………..

आणखी आठवल्यांवर सांगेन………..

                                                                                                                                          सरताज शेख